महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी स्वरांगी संगिता प्रमोद जोशी हिने 98.80 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
स्वरांगी लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. शालेय शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा, परीक्षा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही तिने नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली होती.
अभ्यासाबरोबरच वक्तृत्व आणि कथाकथनाची तिला विशेष आवड आहे. जिल्हा तसेच राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. तिच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.
नृत्य क्षेत्रातही स्वरांगीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कथ्थक नृत्याच्या परीक्षा उत्तीर्ण करत तिने या कलेतही प्राविण्य मिळवले आहे. तसेच चित्रकलेच्या इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षांमध्ये ‘ए’ ग्रेड मिळवत तिने आपल्या कलागुणांची छाप पाडली आहे. अभिनयाचीही तिला विशेष आवड असून एका शॉर्टफिल्ममध्ये तिने भूमिका साकारली आहे. विविध कला आणि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतानाच तिने अभ्यासातही उत्कृष्ट यश मिळवले आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वरांगीने यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार’ही पटकावला आहे. तिच्या सर्वांगीण प्रगतीमुळे शाळा आणि पालकांनाही अभिमान वाटत आहे.
आपल्या यशाचे श्रेय स्वरांगीने युनायटेड इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक, मार्गदर्शन करणाऱ्या सौ. राजवाडे, तसेच आई-वडील आणि रसिका ताई यांना दिले आहे. “शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि नियमित अभ्यास यामुळेच हे यश मिळाले,” असे तिने सांगितले. दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन सायन्स रिसर्च तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
स्वरांगी ही सुरेश दामोदर गद्रे ज्युनियर कॉलेज येथील प्राध्यापिका संगिता जोशी आणि प्रमोद जोशी यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष हेमंत भागवत, कार्याध्यक्ष मकरंद जोशी, कार्यवाह विभाकर वाचासिद्ध, सहकार्यवाह विनोद फणसे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे, उपमुख्याध्यापिका रेवती कारदगे, पर्यवेक्षक . मुंढेकर, . खाडे, वर्गशिक्षिका वैशाली चितळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरांगीच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













