गुहागर तालुक्यातील पालशेत येथे घडलेली ही घटना परिसराला हादरवून टाकणारी ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर गावातीलच माळरानावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सिद्धेश अशोक धातकर असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश हा २८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी होता. त्याने आईला जेवण वाढण्यास सांगितले होते; मात्र त्यानंतर तो अचानक घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. सुरुवातीला तो कुठेतरी गेला असावा, असा कुटुंबीयांचा समज होता; मात्र सायंकाळपर्यंत तो न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
कुटुंबीयांनी त्याचा गावात, परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनीही शोधमोहीम राबवली; परंतु त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर २९ एप्रिल रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही शोधकार्य सुरू केले होते.
दरम्यान, सोमवारी ४ मे रोजी सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास पालशेत येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या पाठीमागील माळरानावर काही ग्रामस्थांना एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, तो मृतदेह सिद्धेश धातकर याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेमुळे पालशेत गावात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणाच्या आकस्मिक मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला असून, या घटनेमागील नेमके कारण काय आहे याचा अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













