खेड : दारूच्या नशेत सख्ख्या भावावर हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथे सख्ख्या भावांमधील वादातून प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या नशेत असलेल्या इसमाने आपल्या भावावर कोयत्याने हल्ला केल्याची ही घटना १ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम भागोजी माने हा सायंकाळी सुमारे ५ वाजता दारूच्या नशेत घरी आला होता. त्यावेळी तो आपल्या धाकट्या भावाच्या मुलाला, मंगेश याला विनाकारण मारहाण करत होता. ही घटना पाहून मोठा भाऊ संतोष भागोजी माने (वय ५०) यांनी हस्तक्षेप करत त्याला जाब विचारला.


याच कारणावरून संतप्त झालेल्या तुकाराम माने याने आपल्या हातातील कोयत्याने संतोष माने यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जोरदार वार केला. या हल्ल्यात संतोष माने गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हल्ल्यानंतरही आरोपीचा संताप कमी झाला नाही. त्याने घटनास्थळी शिवीगाळ करत संतोष माने यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी जखमी संतोष माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात आरोपी तुकाराम माने याच्याविरुद्ध २ मे रोजी मध्यरात्री १२:२४ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या खेड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सख्ख्या भावामध्येच असा हिंसक प्रकार घडल्याने मिर्ले परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *