रत्नागिरी : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 15.55 लाखांची फसवणूक, रत्नागिरीत खळबळ

banner 468x60

रत्नागिरी शहरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १५ लाख ५५ हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मार्च ते एप्रिल या कालावधीत ही फसवणूक घडली असून, सायबर गुन्हेगारांनी अत्यंत चलाखीने ही योजना राबवली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिकाला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला पोलीस महानिरीक्षक असल्याचे सांगितले. त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता तसेच बनावट ओळखपत्रही दाखवले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा त्याच्यावर विश्वास बसला.

यानंतर आरोपीने संबंधित नागरिकाचा संबंध दहशतवादी व भारतविरोधी संघटनांशी असल्याचा खोटा आरोप केला. त्यांच्या बँक खात्याचा वापर करून तब्बल दोन कोटी रुपये व्यवहार झाल्याचा बनावट पुरावाही व्हिडिओ कॉलद्वारे दाखवण्यात आला. यामुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकावर मानसिक दबाव आणण्यात आला.

गेल्या महिनाभर आरोपींकडून वारंवार व्हिडिओ कॉल करून “डिजिटल अरेस्ट” असल्याचे सांगत धमकावण्यात आले. या दबावाखाली संबंधित नागरिकाकडून हप्त्याहप्त्याने एकूण १५,५५,२०० रुपये त्यांच्या खात्यात जमा करून घेतले.


काही दिवसांनी फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सावधानता सूचना :
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,

कोणत्याही अनोळखी व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवू नये
पोलीस किंवा सरकारी अधिकारी कधीही व्हिडिओ कॉलवर पैसे मागत नाहीत
अशा प्रकारच्या धमक्या आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा

या घटनेमुळे रत्नागिरीत एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *