चिपळूण : काळमावाडी धरण परिसरात दुर्दैवी घटना, 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

banner 468x60

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामाकडे आलेल्या चिपळूण तालुक्यातील १६ वर्षीय मुलाचा काळमावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी उघडकीस आली. स्वराज्य संदीप शिंदे (रा. ओवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे चिपळूणसह राधानगरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य शिंदे हा नुकताच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झाला होता. उन्हाळी सुट्टीत वेळ घालवण्यासाठी तो कोल्हापुरातील कळंबा येथे आपल्या मामाकडे, ओंकार पाटील यांच्याकडे आला होता. बुधवारी तो मामा आणि त्यांच्या काही मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. निसर्गरम्य परिसर आणि नदीचे आकर्षण पाहून सर्वजण दूधगंगा नदीत पोहण्यासाठी उतरले.

मात्र नदीच्या पात्रात खोल डोह असल्याने आणि पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने स्वराज्य अचानक पाण्यात बुडू लागला. सुरुवातीला त्याला बाहेर येईल असे वाटल्याने सोबत असलेल्यांनी काही क्षण वाट पाहिली, पण तो बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने घबराट उडाली. त्यानंतर उपस्थितांनी त्याचा शोध घेण्यासाठी नदीत प्रयत्न केले; मात्र अंधुक पाणी आणि खोल डोहामुळे त्याला शोधण्यात अपयश आले.

घटनेची माहिती तत्काळ राधानगरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र सायंकाळनंतर अंधार वाढल्याने शोधकार्य थांबवावे लागले. गुरुवारी सकाळी पुन्हा पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. अखेर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काळोख्या डोहातून स्वराज्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

स्वराज्य हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरीस असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे आई, वडील आणि एक लहान बहीण असा परिवार असून ओवळी गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक शेळके व किरण पाटील पुढील तपास करत आहेत.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, धरण परिसरातील नदी-नाल्यांमध्ये पोहताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. विशेषतः अनोळखी ठिकाणी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *