संगमेश्वरकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर येथे अधिकृत थांबा

banner 468x60

कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल या महत्त्वाच्या रेल्वे गाडीला संगमेश्वर रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या गाडीचा संगमेश्वर येथे थांबा नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

banner 728x90

संगमेश्वर, चिपळूण आणि परिसरातील नागरिकांना मुंबई, गुजरात तसेच दक्षिण भारतातील महत्त्वाच्या शहरांकडे जाण्यासाठी रत्नागिरी किंवा चिपळूण येथे जाऊन गाडी पकडावी लागत होती. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे काही दिवसांपूर्वी लेखी निवेदन सादर करण्यात आले होते.

या मागणीला अधिक बळ मिळावे यासाठी पद्मश्री गजानन माने यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वेचे CMD यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान संगमेश्वर येथे थांबा देण्याची गरज सविस्तरपणे मांडण्यात आली. प्रवाशांची वाढती संख्या, स्थानिकांचा वाढता प्रतिसाद आणि वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्त्व यांचा उल्लेख करण्यात आला होता.

बैठकीत कोकण रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने आता अधिकृत पत्र प्राप्त झाले असून मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल गाडीचा संगमेश्वर येथे थांबा मंजूर झाल्याची खात्री पटली आहे.

या निर्णयामुळे संगमेश्वर आणि परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः मुंबई, सूरत, वडोदरा तसेच केरळकडे प्रवास करणाऱ्यांसाठी हा थांबा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि किफायतशीर होणार आहे.

दरम्यान, या निर्णयाचे स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना तसेच रेल्वे ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून, संबंधित सर्वांनी कोकण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. भविष्यात आणखी गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *