चिपळूण तालुक्यातील उक्ताड परिसरात घरातील व्यक्तीकडूनच चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मुलानेच वडिलांच्या घरातील सोने चोरून मित्रांच्या मदतीने विकल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश बरकू फके (वय ५३, रा. उक्ताड) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील कपाट उघडले असता, त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता सुमारे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या लगडीचे पाच छोटे तुकडे चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या सोन्याची अंदाजे बाजारमूल्य ४ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
घटनेनंतर फके यांनी कुटुंबातील सदस्यांकडे चौकशी केली. सुरुवातीला कोणताही ठोस धागा सापडत नव्हता. मात्र, संशयाच्या आधारे अधिक चौकशी करण्यात आली असता, त्यांच्या मुलगा श्रेयस सुदेश फके याच्याकडे संशयाची सुई वळली. पोलिसांच्या चौकशीत श्रेयसने अखेर चोरीची कबुली दिली.
श्रेयसने हे सोने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरल्याचे सांगितले असून, त्याने हे सोने त्याचे मित्र सिद्धार्थ रमेश चव्हाण आणि रमेश लाला चव्हाण (दोघे रा. जुनी कणसेवाडी) यांच्या मदतीने चिपळूणमधील एका सोनाराकडे विकल्याचे उघड झाले आहे. तिघांनी मिळून ही योजना आखून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेमुळे कुटुंबात मोठा धक्का बसला असून, वडिलांनी स्वतःच्या मुलाविरुद्ध तक्रार देण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातही या प्रकाराची चर्चा सुरू असून, घरातील व्यक्तीकडूनच चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सुदेश फके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी श्रेयस फके, सिद्धार्थ चव्हाण आणि रमेश चव्हाण या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (क) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, चोरी गेलेले सोने परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भरदिवसा आणि घरातीलच व्यक्तीकडून घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांनी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता अधिक काटेकोरपणे राखण्याची गरज व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













