कोकणातून प्रमोद जठार यांना संधी विधान परिषदची उमेदवारी जाहीर, भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवार जाहीर

banner 468x60

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) कडून बहुप्रतिक्षित उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

banner 728x90

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे आणि विवेक कोल्हे यांचा समावेश आहे. यामध्ये विवेक कोल्हे आणि माधवी नाईक यांच्या नावांची आधीपासूनच चर्चा होती आणि ती खरी ठरली आहे.

मात्र, पक्षातील दीर्घकाळ निष्ठेने काम करणारे केशव उपाध्ये यांना यंदाही संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या नावाची चर्चा असतानाही अंतिम यादीत त्यांचा समावेश न झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोकणात भाजप मजबूत करण्याचा प्रयत्न

या यादीतील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे प्रमोद जठार. कोकणातील भाजपचे आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून घडलेले जठार यांनी कॉलेज जीवनापासून पक्षासाठी काम करत संघटन मजबूत करण्यावर भर दिला. कोकणात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा वाटा मानला जातो.

त्यांना उमेदवारी देऊन भाजपने कोकणातील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर संघटन वाढवणे आणि आगामी निवडणुकांसाठी भक्कम पाया तयार करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपने जाहीर केलेल्या या पाच उमेदवारांमध्ये भौगोलिक आणि संघटनात्मक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. विविध भागांतील प्रतिनिधित्व, तसेच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या यादीतून दिसतो.
महिला प्रतिनिधित्वाचाही विचार करत माधवी नाईक यांना संधी देण्यात आली आहे. तर इतर उमेदवारांमधून संघटनात्मक अनुभव आणि स्थानिक प्रभाव लक्षात घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.
या उमेदवारी घोषणेनंतर विधान परिषद निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. इतर पक्षांकडूनही लवकरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या या घोषणेमुळे पक्षाने आगामी निवडणुकीसाठी रणनिती आखत मैदानात उतरण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *