पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांनी भररस्त्यात गाडीत बसून मद्यप्राशन करत पोलिसांशीच हुज्जत घालत धमकी दिल्याची गंभीर घटना पांढरा समुद्र परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोल्हापूर येथील चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि. २६ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मिरकरवाड्याकडे जाणाऱ्या मुल्लावाडा रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची सुझुकी इग्निस (MH 09 EK 9776) ही कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या वेळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार बाळकृष्ण वायचळ हे गस्तीवर होते.
गाडी जवळ जाऊन पाहणी केली असता, कारमध्ये बसलेले चार जण उघडपणे मद्यप्राशन करत असल्याचे आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी संबंधितांना विचारणा करत कारवाई सुरू केली. मात्र, या पर्यटकांनी पोलिसांशी सहकार्य करण्याऐवजी उलट आक्रमक भूमिका घेतली.
सदर व्यक्तींनी मोठ्याने आरडाओरड करत परिसरात गोंधळ घातला. तसेच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करत “तुमचे खोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू” अशी धमकी दिली. त्यामुळे काही काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अनिरुद्ध त्रंबक फडके (वय ४२, रा. जरग नगर), सौरभ सुरेश साळुंखे (वय ३८, रा. आझाद गल्ली), नितीन पोवार आणि सुयश साळुंखे (दोघेही रा. कोल्हापूर) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३५१(२) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी अशा बेजबाबदार वर्तनाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













