प्रतिनिधी – स्वप्नील घटे
मराठी भाषा दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन या दुहेरी औचित्य साधत महाराष्ट्र मंडळ, कतार यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात दाभोळ येथील महिला सना अनस मांडलेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. परदेशात राहूनही मातृभूमीशी असलेले त्यांचे नाते आणि समाजासाठी केलेले सातत्यपूर्ण योगदान यामुळे त्यांचा हा गौरव विशेष ठरला आहे.

कतारमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सना मांडलेकर यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ अध्यापनापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता सामाजिक जाणीव जोपासण्याचे कामही केले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. विशेषतः परदेशात राहणाऱ्या मराठी व भारतीय कुटुंबांना एकत्र आणणे, महिलांना प्रोत्साहन देणे आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणे यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र मंडळ, कतारच्या कार्यकारी समिती (२०२४–२०२६) तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सेवाभाव, समर्पण आणि नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक एकात्मता वाढण्यास आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सना मांडलेकर या प्रख्यात समाजसेवक कमाल मांडलेकर यांच्या सुन असून, त्यांच्या कुटुंबातील समाजसेवेची परंपरा त्यांनी प्रभावीपणे पुढे नेली आहे. ‘फख्रे इंसानियत’ सन्मानाने गौरविण्यात आलेल्या या कुटुंबाच्या कार्याचा ठसा त्यांच्या कार्यशैलीतही स्पष्टपणे दिसून येतो. स्वतःच्या प्रयत्नांतून त्यांनी समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करत अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
या सन्मानामुळे दाभोळ परिसरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













