गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका इंजिनीअरची तब्बल २६ लाख ७६ हजार ९४१ रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित इंजिनीअर बिनय कुमार सिन्हा (वय ४८, मूळ रहिवासी हरियाणा, सध्या खंडाळा-जैगड परिसरात वास्तव्यास) यांनी गुहागर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, सिन्हा यांना फेसबुकवर ‘आदिती शर्मा’ नावाच्या एका महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. सुरुवातीला साध्या गप्पांमधून ओळख वाढवत तिने फेसबुक मेसेंजर आणि नंतर व्हॉट्सॲपवर संवाद सुरू ठेवला. काही दिवसांतच विश्वास संपादन करून तिने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आणि जलद नफा मिळेल, असे आमिष दाखवले.
तिने ‘ETH Ethereum Platform’ आणि ‘USDT’ (टेदर) या क्रिप्टोकरन्सीद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. यासाठी ‘cinchain’ नावाच्या प्लॅटफॉर्मची लिंक पाठवून त्यावर नोंदणी करण्यास सांगितले, तसेच Binance या प्रसिद्ध क्रिप्टो एक्सचेंज ॲपवर खाते उघडण्यासही भाग पाडले. गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी करून देण्यासाठी तिने ‘अंकित शर्मा’ नावाच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक दिला. अंकितने स्वतःला सीनियर फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग कन्सल्टंट असल्याचे सांगून अधिक विश्वास निर्माण केला.
या दोघांच्या सूचनांनुसार सिन्हा यांनी २६ मार्च २०२६ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये एकूण २६,७६,९४१ रुपये ३० पैसे इतकी रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा केली. सुरुवातीला त्यांच्या खात्यावर नफ्याचे आकडे दाखवले जात होते, त्यामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.
मात्र, गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा (विथड्रॉवल) प्रयत्न केला असता तो वारंवार अपयशी ठरला. यानंतर त्यांनी आदिती आणि अंकित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी अंकित शर्मा आणि आदिती शर्मा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३१८, ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या सायबर फसवणुकीचा अधिक तपास सुरू असून संबंधित बँक व्यवहार, मोबाईल नंबर आणि डिजिटल पुराव्यांचा मागोवा घेतला जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नयेत, तसेच “जलद आणि हमखास नफा” देणाऱ्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













