दापोली : 14 वर्षीय मुलीचा विनयभंग, मारण्याची धमकी , 65 वर्षीय किशोर चौगुले चुलत्याविरुद्ध विरारमध्ये गुन्हा दाखल

banner 468x60

विरार पूर्व परिसरात नातेसंबंधांना हादरा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन पुतणीचा विनयभंग केल्याप्रकरणी ६५ वर्षीय चुलत्याविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर तुकाराम चौगुले (वय 65, रा. कारगिलनगर, विरार पूर्व) असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

banner 728x90

पीडित मुलगी ही मूळची दापोली तालुक्यातील रहिवासी असून सध्या शिक्षणासाठी विरार पूर्व येथे नातेवाईकांकडे राहत आहे. ती स्थानिक शाळेत इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत आहे. २०२२ साली एका कौटुंबिक कारणासाठी ती विरारमध्ये आली असताना घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी चुलत्याने तिचा विनयभंग केला. या घटनेबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे भीतीपोटी पीडित मुलीने बराच काळ हा प्रकार गुप्त ठेवला. मात्र, आरोपीची हिंमत वाढत गेली आणि डिसेंबर २०२५ मध्ये त्याने पुन्हा पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

१ आणि २ डिसेंबर रोजी त्याने तिचा पाठलाग करत तिला त्रास दिला. या सततच्या मानसिक छळामुळे पीडित मुलगी घाबरून गेली होती. अखेर धाडस करून तिने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला.

याबाबत सविस्तर पीडितेच्या तक्रारीत काय म्हटले ते पाहा

चुलत काका किशोर तुकाराम चौगुले (वय अंदाजे ६५ वर्षे) यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त चुलत काकी यांच्यासोबत मूळगावी मु. चिंचाळी, पो. विसापूर, ता. दापोली येथे गेले होते. त्यानंतर आम्ही सातेरे येथे लग्नसमारंभासाठी गेलो होतो. लग्नानंतर मी माझे चुलत काका किशोर चौगुले, त्यांची मुलगी आणि इतर नातेवाईकांसह कारने मनवेलपाडा, विरार (पूर्व) येथे आले.

त्या वेळी मी काकांच्या राहत्या घरी (काळिका माता मंदिराच्या मागील बाजूस असलेली चाळ, कारगिलनगर, विरार पूर्व) राहण्यासाठी गेले होते. रात्रभर प्रवास केल्याने मी थकलेली असल्यामुळे झोपले होते. सकाळी सुमारे ७.३० वाजता, घरात मी एकटीच असताना, माझे चुलत काका किशोर चौगुले यांनी मला झोपेतून उठवून माझ्या शरीरावर, छातीवर व पाठीवर अयोग्य रीतीने हात फिरवले. हा प्रकार लक्षात येताच मी त्यांना विरोध केला व त्यांच्या वर्तनाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “माझ्याकडून चूक झाली, पुन्हा असे होणार नाही, कोणाला सांगू नकोस” असे सांगून मला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर मी तात्काळ माझ्या घरी परत गेले. काही दिवसांनी मनवेलपाडा परिसरात कामानिमित्त गेले असता आरोपी पुन्हा भेटला व मला भेटण्याचा आग्रह करू लागला, मात्र मी त्यास नकार देऊन निघून गेले.

यानंतर दिनांक ०१/१२/२०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजता तो पुन्हा भेटला व दुसऱ्या दिवशी म्हणजे ०२/१२/२०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मोहक सिटी, विरार (पूर्व) येथे भेटण्यास भाग पाडले. त्यानुसार मी तेथे गेले असता त्याने पुन्हा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी त्यास ठाम विरोध करत पोलीस तक्रार करण्याचा इशारा दिला. यावरून आरोपीने मला हाताने मारहाण केली व “हा प्रकार घरी सांगितल्यास तुझ्या कुटुंबाला ठार मारीन” अशी धमकी दिली.

ही संपूर्ण घटना मी माझ्या चुलत मामाच्या मुलगी हिला सांगितली. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी माझ्या चुलत काका किशोर चौगुले यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देत आहे.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी तात्काळ विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११५(२), ३५१(२) तसेच ‘बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम’ (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम ८ व १२ नुसार गुन्हा (रजिस्टर क्रमांक ६८७/२०२५) दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक लालु मारुती तूर करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. या घटनेमुळे विरार तसेच दापोली परिसरात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नातेसंबंधांमध्येही अशा विकृत प्रवृत्ती दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *