लांजा तालुक्यात घरमालकाच्या परवानगीशिवाय घराच्या छतावरील कौले, लाकडी रिपा व वासे काढून मोडतोड करत सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदार श्रीपाद महादेव कदम (वय ५२, सध्या रा. काशिमीरा, मिरा रोड पूर्व, जि. ठाणे) यांनी लांजा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, लांजा तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे त्यांचे व इतर साक्षीदारांचे सामूहिक मालकीचे घर आहे. या घराचे छप्पर एकच असून घरातील भाग मात्र अंतर्गत स्वरूपात विभक्त आहेत.
या घराच्या दुरुस्तीचे काम राजापूर तालुक्यातील झर्ये येथील बाळकृष्ण रमेश पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र, काम करताना संबंधितांनी घरमालकाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता छपरावरील कौले, लाकडी रिपा व वासे काढून टाकत मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कृतीमुळे घराचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे ४ लाख रुपयांची हानी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तक्रारीची दखल घेत बाळकृष्ण पांचाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२९(४) व ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून, सामूहिक मालकीच्या मालमत्तांमध्ये काम करताना नियम व परवानगीचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव पुन्हा एकदा समोर आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














