दापोली : एसटी चालकाला मारहाण किरकोळ वादातून मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा

banner 468x60

सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी घटना दापोली तालुक्यात घडली आहे. बोरिवली–दापोली एसटी बस चालवत असताना किरकोळ कारणावरून प्रवाशांनी चालकास शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदविण्यात आला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, साई विवेक कदम (वय २७, रा. काळकाई कोंड, दापोली) हे २२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे बोरिवलीहून दापोलीकडे एसटी बस (क्र. एम.एच. ४९ बी.ई. ८९४२) घेऊन येत होते. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बस चिंचकाळी फाटा येथे पोहोचली असता, बसमधून उतरण्याच्या वेळी काही प्रवाशांमध्ये आणि चालक कदम यांच्यात किरकोळ वाद झाला. सुरुवातीला साध्या शाब्दिक चकमकीत सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच चिघळला.


राहुल ज्ञानेश्वर बिराजदार, गणेश बालाजी बिराजदार, नबाल सोमनाथ कांबळे आणि शुभम बसवराज पाटील (सर्व रा. काटगाव, जि. धाराशिव) यांनी चालकाला लक्ष्य करत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर या चौघांनी चालक कदम यांना चापट मारत धक्काबुक्की केली. इतकेच नव्हे तर “जीव घेऊ” अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील इतर प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. काही प्रवाशांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर संबंधित प्रवासी तेथून निघून गेले.

या घटनेनंतर चालक साई कदम यांनी तत्काळ दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३५३(३) अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश महादेव तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साखरे करत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, एसटीसारख्या सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या चालकावर प्रवाशांकडून झालेल्या या हल्ल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *