देवरूख : अमली पदार्थ सेवन करताना तरुण रंगेहात पकडला; गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथे अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईत पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका तरुणाला रंगेहात पकडत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री चर्मालय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

banner 728x90

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव फैजान फैरोज धामसकर (वय २१, रा. फणसट मुस्लिमवाडी, ता. संगमेश्वर) असे आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८:१० वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीकडे जाणाऱ्या शांत आणि विरळ वस्तीच्या परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती देवरूख पोलीस ठाण्याला मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलीस कॉन्स्टेबल सचिन गोविंद लगारे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी परिसरात पाहणी करत छापा टाकला असता, आरोपी फैजान हा सिगारेटच्या सहाय्याने गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी कॉन्स्टेबल सचिन लगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोंद रात्री १०:०३ वाजता अधिकृतरीत्या करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढू नये यासाठी पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत गस्त आणि छापेमारी सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास देवरूख पोलीस ठाण्याकडून सुरू असून, संबंधित आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *