कोकणच्या मातीतील उदयोन्मुख आणि प्रतिभावान खेळाडू रिया स्नेहा सचिन ठसाळे हिने जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन या खेळात उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या रियाने आपल्या मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
दि. १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी चेन्नई (तमिळनाडू) येथील हॉल ऑफ जिमनॅस्टिकमध्ये पार पडलेल्या ७व्या ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप तसेच २ऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप निवड चाचणी स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत रियाने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत तिसरे स्थान पटकावले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
या यशामुळे रिया आता चीनमधील हाँगकाँग येथे होणाऱ्या आशियाई जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या क्रीडा कारकिर्दीतील हे एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद पाऊल मानले जात आहे.
रिया ही चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावची असून सध्या मुंबईतील नायगाव-दादर (पूर्व) येथे वास्तव्यास आहे. ती IES V. N. Sule Guruji English Medium Secondary School, दादर हिंदू कॉलनी येथे शिक्षण घेत आहे. लहान वयातच खेळाची आवड निर्माण होऊन कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावामुळे तिने हे यश संपादन केले आहे.
तिच्या या यशामागे आई-वडील स्नेहा ठसाळे आणि सचिन ठसाळे यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच पॉवर जम्प स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षिका शिवानी दौड मॅडम आणि शेफाली मॅडम यांचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे.
रिया ठसाळेच्या या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार, कुटुंबीय तसेच स्थानिक नागरिकांकडून तिचे मनापासून कौतुक होत आहे. भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














