खेड : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आलेले शासकीय विश्रामगृह अद्यापही बंद अवस्थेत असून, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेली ही वास्तू सध्या निष्प्रयोजन ठरत असल्याचे चित्र आहे. सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला असला, तरी आवश्यक निधीअभावी उर्वरित काम रखडल्याने विश्रामगृह सुरू होण्यास विलंब होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या विश्रामगृहाच्या तळमजल्यावरील चार सूट्सचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात नागरिक व प्रवाशांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे आवश्यक मनुष्यबळाचा अभाव. केअरटेकर, चौकीदार आणि खानसामा यांसारखी महत्त्वाची पदे अद्याप रिक्त असल्याने संपूर्ण व्यवस्थापन ठप्प आहे. परिणामी, ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरू करण्यासही अडथळा निर्माण झाला आहे.
विश्रामगृहाचे उर्वरित काम अपूर्ण असल्याने तसेच आवश्यक सोयी-सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने संबंधित विभागाकडून ते सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. दरम्यान, इतका मोठा खर्च करून उभारलेली इमारत वापरात नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
खेड हे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे शासकीय विश्रामगृहाची गरज मोठ्या प्रमाणात आहे. विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच बाहेरून येणारे प्रवासी यांना निवासाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी हे विश्रामगृह उभारण्यात आले होते. मात्र, ते सुरूच न झाल्याने त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही.
परिसरातील नागरिकांनी हंगामी तत्वावर का होईना, आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देत विश्रामगृह तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली आहे. तसेच, उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर निधी मंजूर करून उर्वरित काम पूर्ण करावे आणि आवश्यक कर्मचारी नियुक्त करून विश्रामगृह नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














