Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

खेड : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार, चालक फरार, खेडमध्ये खळबळ

banner 468x60

खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरात शुक्रवारी (दि. 17 एप्रिल) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. नवभारत हायस्कूलसमोर महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ही घटना घडली असून अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित सूर्यकांत फावरे (वय 37, रा. लोटे मालवाडी) हे कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्रीच्या सुमारास ते भरणे नाका येथील नवभारत हायस्कूलसमोर महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने येणाऱ्या काळ्या रंगाच्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की फावरे यांना गंभीर दुखापत झाली, विशेषतः डोक्याला मोठा मार बसल्याचे सांगितले जाते.

अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. काही क्षणांतच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत रुग्णवाहिका बोलावली आणि जखमी अवस्थेतील फावरे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित कारचालकाने कोणतीही मदत न करता वाहन भरधाव वेगात चिपळूणच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच काही तरुणांनी तात्काळ आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधून पोलिसांना कळवले. खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात वाहन व चालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातामुळे भरणे नाका परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे फावरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *