चिपळूण : डेरवण-राजेवाडी धरण दुरुस्तीला वेग; 14.99 कोटींच्या कामाची आमदार शेखर निकम यांच्याकडून सखोल पाहणी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील डेरवण-राजेवाडी धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर वेग मिळत असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी रु. 14 कोटी 99 लाखांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सविस्तर आढावा घेतला.

banner 728x90

सन 2025 पासून सुरू असलेल्या या दुरुस्ती कामात सध्या विविध टप्प्यांवर काम सुरू आहे. पाहणीदरम्यान आमदार निकम यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच गतीबाबत माहिती घेतली. यावेळी चिपळूण जलसंधारण विभागाचे उपअभियंता सागर भराडे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, जि. प. सदस्य संजय कदम आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपअभियंता सागर भराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक असलेले मातीकाम सध्या वेगाने सुरू असून ते 20 मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासोबतच धरणाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असलेले गेट वॉल्व बसविण्याचे कामही मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावर्षी पावसाळ्यात धरणात साधारण 40 टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता असून, त्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल.

गेल्या काही वर्षांपासून या धरणात गळतीची समस्या गंभीर बनली होती. परिणामी, परिसरातील सुमारे 40 गावांना दरवर्षी पाणीटंचाईचा मोठा फटका बसत होता. शेती, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन वापरासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन या धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात आल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सन 2027 पर्यंत हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर परिसरातील गावांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यामुळे कामातील अडथळे दूर होऊन दुरुस्तीच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चिपळूण तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *