चिपळूण शहरातील वालोपे भोजवाडी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका वेल्डरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वेल्डरला वाचवण्यासाठी धावून आलेल्या महिलेलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी केतन प्रकाश भोसले (रा. वालोपे, चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतेवाडी परिसरात राहणारे प्रमोद महादेव जाधव हे व्यवसायाने वेल्डर असून, ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ते आपली परिचित स्वरा मोहिते हिच्या घरी चायनीज खाद्यपदार्थाचे पार्सल देण्यासाठी गेले होते. याचवेळी आरोपी केतन भोसले हा तेथे आला. जाधव हे स्वरा मोहिते यांना नेहमी मदत करतात, याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातूनच त्याने अचानक जाधव यांच्यावर हल्ला चढवला.
आरोपीने हातातील बांबूच्या काठीने प्रमोद जाधव यांच्या मानेवर, खांद्यावर आणि पायावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्वरा मोहिते या मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या. मात्र आरोपीने त्यांनाही न जुमानता बांबूने मारहाण केली. त्यामुळे त्या देखील जखमी झाल्या.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत करून सुरक्षित ठिकाणी हलवले. दोघांनाही उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.
प्राथमिक तपासात आरोपी आणि स्वरा मोहिते यांच्यात पूर्वीपासून कायदेशीर वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याच वादातून आरोपीने ही मारहाण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेनंतर प्रमोद जाधव यांनी १२ एप्रिल रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) अंतर्गत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













