खेड : जुना पूल पाडल्याने फुरूस–पोयनार मार्ग बंद; ग्रामस्थांची गैरसोय

banner 468x60

खेड तालुक्यातील फुरूस–पोयनार मार्गावरील सुमारे ८० वर्षे जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच पाडला असून, त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने हे काम वेगाने सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मात्र, पुलाचे काम सुरू झाल्यामुळे फळसोंडा परिसर आणि पोयनार गावातील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पर्यायी वाहनमार्गाची कोणतीही व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

प्रशासनाकडून सध्या केवळ पायवाट स्वरूपात तात्पुरता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मार्गावरून रिक्षा, दुचाकी किंवा चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामांसाठी पायीच प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः शाळकरी मुलांना दररोज पायपीट करून शाळेत जावे लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवा पोहोचू शकत नसल्याने संभाव्य संकटाची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी रस्ता किंवा तात्पुरता पूल उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून, पुलाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *