दापोली तालुक्यातील मुर्गीज गोमलेवाडी येथे एका १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आर्यन प्रकाश गोमले (वय १७ वर्षे ३ महिने) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. एका उमद्या, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने इतक्या लहान वयात जीवन संपवल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हा इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. तो अभ्यासात सामान्य असून मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. ९ एप्रिल २०२६ रोजी त्याची तोंडी परीक्षा सुरू होणार होती. परीक्षेचा ताण आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेला मानसिक दबाव यामुळे तो अस्वस्थ होता, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आर्यनची आई प्रतिभा प्रकाश गोमले या घरातील कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी घरात आर्यन एकटाच होता. याच दरम्यान त्याने बेडरूममधील लाकडी वाशाला नायलॉनच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्याला तत्काळ खाली उतरवून उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे गोमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परीक्षेच्या दिवशीच मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने पालक, शिक्षक आणि समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढते मोबाईल व्यसन, शैक्षणिक स्पर्धा, परीक्षेचा दबाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. १० एप्रिल रोजी या घटनेची अधिकृत माहिती देण्यात आली. आर्यनच्या निधनामुळे मुर्गीज गोमलेवाडी गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













