रत्नागिरी शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच अस्वस्थता असताना गुरुवारी सकाळी हिंदू कॉलनी परिसरात घडलेल्या धाडसी चैन स्नॅचिंगच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने चोरट्यांचे वाढते धाडस पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू कॉलनी येथील रहिवासी कांचन जैन या सकाळी घराबाहेर उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्याजवळ येत पत्ता विचारण्याचा बहाणा केला. काही क्षणातच मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनवर झडप घालत ती जोरात हिसकावून घेतली. हा प्रकार इतक्या झटपट घडला की जैन यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही.
चैन हातात लागताच दोन्ही चोरट्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने पलायन केले. या घटनेनंतर परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दोघेही सडपातळ बांध्याचे तरुण असून त्यापैकी एकाने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. दुसरा तरुण उंचीने अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही मराठीत संवाद साधत असल्याने ते स्थानिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात काही संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर येत असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेतही महिलांना सुरक्षित वाटत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना, अनोळखी व्यक्तींशी संभाषण करताना काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच महागडे दागिने परिधान करून एकटे फिरणे टाळावे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा लवकरच शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













