खेड तालुक्यातील शिरगाव पिंपळवाडी येथील लघुपाटबंधारे धरण परिसरात मंगळवारी (दि. ७ एप्रिल २०२६) दुपारच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. बैलांच्या झुंजीदरम्यान झालेल्या धक्क्यामुळे एका ५० वर्षीय महिलेचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत महिलेचे नाव दिपाली दिलीप ढनळे (वय ५०, रा. खोपी कुपरेवाडी, ता. खेड) असे असून त्या आपल्या कुटुंबीयांसह राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली ढनळे या आपल्या पुतण्या संतोष कृष्णा ढवळे यांच्या दोन मुलांसह आणि गुरांसोबत दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शिरगाव पिंपळवाडी येथील लघुपाटबंधारे धरणाजवळ पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या.
दरम्यान, अचानक दोन बैलांमध्ये झुंज सुरू झाली. ही झुंज एवढी तीव्र होती की, त्यातील एका बैलाचा जोरदार धक्का दिपाली ढनळे यांना लागला. या अनपेक्षित धक्क्यामुळे त्या संतुलन गमावून थेट धरणाच्या खोल पाण्यात कोसळल्या. पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने आणि पोहता न आल्याने त्या बुडू लागल्या.
घटनेनंतर उपस्थितांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली आणि अचानक घडलेल्या प्रसंगामुळे त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सायंकाळी ४.५० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आमू. क्रमांक २०/२०२६ नुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
भर दुपारी घडलेल्या या विचित्र आणि दुर्दैवी अपघातामुळे ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जनावरांना पाणी पाजताना तसेच धरण, तलाव यांसारख्या ठिकाणी जाताना अधिक सतर्कता बाळगणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













