रत्नागिरी शहराजवळील प्रसिद्ध मांडवी जेटी येथे सोमवारी (ता. ७) रात्री सुमारे नऊच्या सुमारास एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिर परिसरात राहणारी ही महिला सायंकाळनंतर मांडवी जेटीकडे आली होती. काही वेळ ती जेटी परिसरात फिरत होती. त्यानंतर अचानक तिने आपल्या चपला काढून जेटीवरील लोखंडी ग्रीलच्या कठड्यावर चढत समुद्रात उडी मारली. हा प्रकार अचानक घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सुदैवाने त्या वेळी समुद्राला ओहोटी असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना स्थानिक नागरिक ईशान खानविलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करत इतरांना बोलावले.
यावेळी तेथे उपस्थित असलेले नगरसेवक बंटी किर आणि नंदू मोरे हेही तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावले. सर्वांनी मिळून महिलेला पाण्यातून बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी आणून बसवले. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ जेटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पाण्यात उडी मारताना महिलेच्या पायाला दुखापत झाली होती. उपस्थितांनी तत्काळ तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एक जीव वाचल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













