दापोली तालुक्यातील माटवण गावचे सुपुत्र अक्षय संजय महाडिक यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुन्हा एकदा कोकणचा अभिमान उंचावला आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे पोलीस अधीक्षक (SP) पदावर त्यांची पदोन्नती झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अक्षय महाडिक हे मूळचे माटवण (ता. दापोली) येथील रहिवासी असून सध्या त्यांचे कुटुंब खेड तालुक्यात वास्तव्यास आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या महाडिक यांनी आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवत २९ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश मिळवला.
२०२२ च्या आयपीएस-आरआर बॅचचे अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अल्प कालावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धती, शिस्तबद्ध कारभार आणि जनतेशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांची ओळख एक कार्यक्षम अधिकारी म्हणून निर्माण झाली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय सेवेची दखल घेत २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांना ‘डीजी कमेंडेशन डिस्क’ (सिल्व्हर) या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा आणि समर्पणाचा गौरव मानला जातो. याचबरोबर १ जानेवारी २०२६ पासून त्यांना वरिष्ठ श्रेणीही लागू करण्यात आली.
यानंतर ३० मार्च २०२६ रोजी त्यांनी उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या मुजफ्फरनगर येथे पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात जबाबदारीची मोठी धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत उत्तर प्रदेशसारख्या विशाल आणि आव्हानात्मक राज्यात वरिष्ठ पोलीस पदावर विराजमान होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, दापोली, खेड तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
अक्षय महाडिक यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या पुढील कारकिर्दीतही ते अशीच उल्लेखनीय कामगिरी करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













