चिपळूण : स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान

banner 468x60

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि परिणामकारक कामगिरी केल्याबद्दल स्वप्ना प्रशांत यादव यांना ‘बेस्ट सीईओ’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. यांच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात हा सन्मान करण्यात आला.

शुक्रवारी (ता. ३) कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या मेळाव्याला राज्यभरातील सहकार क्षेत्रातील महिला पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला, त्यात स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कारासाठी विशेष सन्मान करण्यात आला.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वप्ना यादव यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी केलेले नियोजनबद्ध काम, आर्थिक शिस्त, ग्राहकाभिमुख सेवा आणि पारदर्शक कारभार यामुळे त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने अल्पावधीतच विश्वासार्हता आणि स्थैर्य निर्माण करत ठोस प्रगती साधली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन खासदार धनंजयराव महाडिक यांच्या हस्ते झाले. समारोपप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रुपाराणी निकम, राजश्रीताई पाटील, अरुंधती महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच प्रशांत यादव, ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे, सुरेखा लवांडे, भारतीताई मुथ्था, निलिमा बावणे, अंजलीताई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली.

दरवर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची परंपरा या मेळाव्यातून जपली जाते. यंदाही विविध पतसंस्थांमधील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. त्यात स्वप्ना यादव यांच्या कामगिरीने विशेष छाप पाडली.

स्वप्ना यादव यांनी संस्थेच्या विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला असून संस्थेची आर्थिक घडी मजबूत झाली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे संस्थेला नवे बळ मिळाले आहे.

या सन्मानामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *