लांजा : झोपलेले असताना घराच्या बांधकामातील चिरे कोसळून महिलेचा मृत्यू

banner 468x60

लांजा शहरातील सुतारवाडी आगरगाव येथे शुक्रवारी दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वनिता वसंत पांचाळ असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वनिता पांचाळ यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. शेजारी पूजा असल्यामुळे शुक्रवारी बांधकामाचे काम बंद ठेवण्यात आले होते. दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या घरातील एका खोलीत विश्रांती घेत होत्या. याच वेळी माळ्यावर ठेवलेली लाकडी फळी अचानक तुटली आणि त्यावर ठेवलेले जड चिरे खाली कोसळले. हे चिरे थेट त्यांच्या डोक्यावर पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.


चिरे कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वनिता पांचाळ यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढून त्वरित लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.


या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.


दरम्यान, अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *