चिपळूण : दुचाकी दिली नाही म्हणून मित्राला मारहाण, लोखंडी पाईपने मारहाण

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील पाग पॉवर हाऊस परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ मोटारसायकल वापरण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाने ४५ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


कापसाळ मोरेवाडी येथील रहिवासी श्रीकांत श्रीपत सावंत (वय ४५) हे २७ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास पाग येथील ‘श्री धाडवे’ यांच्या वेल्डिंग दुकानात ट्रकच्या दुरुस्तीच्या कामासाठी गेले होते. याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या राकेश गोरिवले याने सावंत यांच्याकडे त्यांची मोटारसायकल मागितली.

मात्र, सावंत यांनी गाडी देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले.
रागाच्या भरात आरोपी राकेश गोरिवले याने लोखंडी पाईप उचलून सावंत यांच्यावर तुफान हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर आणि पायांवर जोरदार प्रहार करण्यात आले. या हल्ल्यात डाव्या हाताच्या दंडाला फ्रॅक्चर, उजव्या खांद्याला फ्रॅक्चर, उजव्या पायाच्या घोट्याला फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर दुखापत इतक्या भीषण मारहाणीमुळे सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


हल्ल्यादरम्यान आरोपीने शिवीगाळ करत सावंत यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
घटनेनंतर काही दिवसांनी, २ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११७(२), ११८(१), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत असून आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *