राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरच्या अनधिकृत विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा विभागाने आज धडक कारवाई करत ‘सद्गुरु गॅस सेवा’ या नावाने सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात गैरप्रकार समोर आणले
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित केंद्रातून ग्राहकांकडून गॅस कार्ड (पुस्तिका) जमा करून त्यावर सिलेंडर बुकिंग करण्यात येत होते. त्यानंतर हे सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याचा आरोप आहे. काही ग्राहकांच्या नावावर सिलेंडर उचलूनही त्यांना प्रत्यक्षात गॅस न दिल्यामुळे हा प्रकार उघड झाला.
सध्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर या परिसरात काळाबाजार वाढल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर राजापूर पुरवठा विभागाने तपासणी केली असता, दुकानात एक कमर्शियल भारत गॅस सिलेंडर आणि तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका आढळून आली. ही सर्व पुस्तिका आणि सिलेंडर १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता जप्त करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते यांनी “आम्ही गेली ४० वर्षे सेवा देत आहोत. ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे ठेवून जातात,” असे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींशी संबंधित कनेक्शन ट्रान्सफर, बुकिंग प्रक्रिया आणि कार्ड वापराबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान पुरवठा निरीक्षक निलेश लाड, मंडळ अधिकारी पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आदी उपस्थित होते.
या घटनेमुळे संपूर्ण पाचल परिसरात खळबळ उडाली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













