चिपळूण : रामपूर जंगलात हाडांसह अंगठ्या आणि कृत्रिम दात सापडल्याने नरबळीचा संशय की अन्य गुन्हा?

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील रामपूर-आवटेवाडी परिसरातील जंगलमय भागात सापडलेल्या छोट्या हाडांमुळे संपूर्ण परिसरात भीती व खळबळ निर्माण झाली आहे. ही हाडे मानवी आहेत की अन्य प्राण्यांची, याचा नेमका उलगडा अद्याप झालेला नसून ती तपासासाठी कोल्हापूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत. या अहवालानंतरच या गूढ प्रकरणाचा खरा उलगडा होण्याची शक्यता आहे.


शनिवारी या जंगलमय भागात जळालेल्या जागेत काही छोटी हाडे आढळून आली. या हाडांच्या शेजारी दोन अंगठ्या, चार एकत्र असलेले कृत्रिम दात, पूर्णपणे जळालेल्या बॅगेचा तुकडा, छोटी चावी, लोखंडी स्क्रू व इतर साहित्यही सापडले. या सर्व वस्तूंमुळे या प्रकरणाला अधिक गूढ वळण मिळाले असून परिसरात ‘नरबळी’च्या चर्चेला उधाण आले आहे.
प्राथमिक निरीक्षणानुसार, घटनास्थळी आढळलेली हाडे सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वीची असावीत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संबंधित भाग जळालेला असल्याने इतर अवशेष जळून खाक झाले असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.


या जंगलमय परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा बागा असून त्याठिकाणी स्थानिक तसेच नेपाळी मजूर काम करतात. पोलिसांनी आंबा बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी व एका स्थानिक मजुरांची चौकशी केली असता, महिनाभरापूर्वीच त्यांना ही हाडे दिसल्याचे समोर आले. मात्र भीतीपोटी त्यांनी ही माहिती कोणालाही दिली नव्हती.

https://www.instagram.com/reel/DWf4T-yDTYJ/?igsh=YWEwcnR1cmtyY2Zl

अखेर आंबा बाग प्रमुखांना कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ही घटना मानवी वस्तीपासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम जंगल भागात घडली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी आणि कशासाठी आले होते, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.


घटनास्थळी सापडलेल्या वस्तू आणि परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. रामपूर परिसरात कुठे बुवाबाजी किंवा अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत का, याची गुप्त माहितीही गोळा केली जात आहे.

सध्या पोलिसांकडून कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक वेग मिळणार आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *