खेड तालुक्यातील बहीरवली भोईवाडी येथे कौटुंबिक वादातून चिघळलेल्या रागातून एका तरुणाने आपल्या चुलत सासऱ्यावर सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या हल्ल्यात ६३ वर्षीय चंद्रकांत धोंडू जाधव गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी खेड पोलिसांनी आरोपी सचिन सत्यवान जुवळे (वय ३३, रा. कोतवाली भोईवाडी) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत जाधव यांचे मोठे बंधू भागोजी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आरोपी सचिन जुवळे याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या सचिनने मनात राग धरून ठेवला होता. या रागातूनच त्याने सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
घटनेच्या रात्री सचिन जुवळे हा मोटारसायकलवरून चंद्रकांत जाधव यांच्या घराबाहेर आला. त्याने घरासमोर उभे राहून चंद्रकांत जाधव आणि त्यांचे भाऊ भागोजी जाधव यांना उद्देशून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच दोघांनाही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वादाचे स्वरूप अधिक तीव्र होत गेल्यानंतर सचिनने स्वतःजवळ बाळगलेल्या लोखंडी सुऱ्याने चंद्रकांत जाधव यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला जोरदार वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जाधव गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला.
जखमी अवस्थेतही चंद्रकांत जाधव यांनी धैर्य दाखवत खेड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS 2023) कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक व कौटुंबिक वादातून घडल्याचे स्पष्ट होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













