चिपळूणमधील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला; दाभोळमधील पत्रकारांचा तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी

banner 468x60

चिपळूण येथील बहादूर शेख नाका परिसरात दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर २५ मार्च रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण पत्रकारिताविश्वात संतापाची लाट उसळली आहे. कर्तव्य बजावत असताना पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याचा दाभोळमधील पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, हल्लेखोरांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या उपोषणासंदर्भातील वृत्तांकनासाठी दीपक भागवत हे बहादूर शेख नाका येथे गेले होते. यावेळी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात भागवत जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दाभोळमधील पत्रकारांनी एकत्र येत या प्रकाराचा निषेध केला. कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांच्यासह स्वप्नील घटे, रवींद्र साळवी, राजस मुरकर आणि राजेंद्र वाडकर यांनी या घटनेचा निषेध करत पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सांगितले.

पत्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “समाजातील विविध प्रश्न, अन्याय आणि घडामोडी जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. मात्र अशा पत्रकारांवरच हल्ले होणे ही अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ही घटना लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारी असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात करणारी आहे.”

तसेच, राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आणत, “पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे का?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. संबंधित हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भविष्यात अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही पत्रकारांनी दिला.

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *