खेड : लोटे स्फोटातील मृतांचा आकडा चारवर, माजी सरपंच नंदकिशोर राणे यांचा मृत्यू, भीषण रिअॅक्टर स्फोटानंतर मृत्यूंची मालिका सुरूच, दोन जखमींची प्रकृती चिंताजनक

banner 468x60

खेड लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. दाभीळ येथील रहिवासी व माजी सरपंच नंदकिशोर राणे (वय ४०) यांचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

banner 728x90 banner 728x90

६ मार्च रोजी झालेल्या या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या राणे यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या पाच वर्षांत सरपंच म्हणून काम पाहणाऱ्या राणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे. या अपघातात त्यांचा सख्खा भाऊ रणजीत राणे हाही गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या आधी मुरुडे येथील रघुनाथ खामकर, लातूरचे असद खान आणि बंगालचे सुजन दास (वय २९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नंदकिशोर राणे यांच्या निधनामुळे मृतांचा आकडा चौघांवर पोहोचला आहे.

सदर स्फोट ६ मार्च रोजी दुपारी रासायनिक प्रक्रिया सुरू असताना रिअॅक्टरमध्ये झाला होता. त्यानंतर लागलेल्या आगीत एकूण ११ कामगार गंभीर भाजले होते. त्यापैकी सहा जणांना ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल तसेच मुंबईतील मसिना रुग्णालयात हलवण्यात आले होते. ७० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या रुग्णांवर अजूनही उपचार सुरू असून, दोन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्राणहानीनंतरही स्थानिक पुढाऱ्यांची शांत भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *