गुहागर : अंजनवेल समुद्रात पकडलेल्या दोन नौकांना 8 लाख 27 हजारांचा दंड, नौका दाभोळ बंदरात

banner 468x60

गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमोर समुद्रात 20 वाव च्या अंतरावर मासेमारी करणारी एलईडी मच्छीमार नौका आणि दुसरी ट्रॉलिंग नौका पकडण्यात आली होती. यातील पहिल्या सद्गुरु कृपा एलईडी नौका मालकाला 5 लाख रुपये तर दुसऱ्या ध्रुवशक्ती ट्रॉलिंग नौकेला 3 लाख 27 हजार 800 रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय अधिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांनी दिला आहे.

banner 728x90 banner 728x90


गुहागर तालुक्याच्या समुद्रात सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्यासह पर्यवेक्षक विनायक शिंदे आणि सुरक्षारक्षक अक्षय मयेकर आणि सहकाऱ्यांसोबत नवदुर्गा गस्ती नौकेने गेल्या शुक्रवारी समुद्रात गस्त घालत होते.

यावेळी त्यांना रत्नागिरीतील अ. र. मयेकर यांच्या मालकीची श्री सद्गुरु कृपा नौका एलईडी प्रकाशात मासेमारी करत असल्याचे दिसून आले. दुसरी गुजरात दीव येथील ट्रॉलिंग मासेमारी नौका मासेमारी करताना दिसून आली. राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच 12 नॉटीकल मैल अंतराच्या आत समुद्रात मासेमारी करण्यास बंदी आहे. या दोन्ही नौका 20 वाव च्या आता मासेमारी करताना पकडण्यात आल्या आहेत. एलईडी प्रकाशातील मासेमारीला तर बंदीच आहे.

गेल्या शुक्रवारी रात्री 10 वा. च्या सुमारास पकडलेल्या या दोन्ही नौका दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आल्या होत्या. लगेचच परवाना अधिकारी स्वप्निल मयेकर यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात प्रतिवेदन दाखल केले होते. मंगळवारी या दोन्ही नौकांसंदर्भात अभिनिर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली.

अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी एलईडी मासेमारी करणाऱ्या श्री सद्गुरु कृपा नौका मालक अ. र. मयेकर यांना 5 लाख रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय दिला. गुजरातमधील नौका मालक विनोद सोळंखी यांना 3 लाख 27 हजार 800 रु. चा दंड भरण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *