मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबेळे, ता. चिपळूण) याला अटक करण्यात मंडणगड पोलिसांना यश आले आहे. सुमारे अडीच हजार किलोमीटरचा पाठलाग करून पोलिसांनी सापळा रचत शुक्रवारी रात्री आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.
केवळ पाच दिवसांत शोधमोहीम पूर्ण करून आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळवले असून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, या कालावधीत बेपत्ता असलेली आणि आरोपीने आपल्या सोबत ठेवलेली एक युवतीही पोलिसांनी सुखरूप परत आणली आहे. तालुक्यातील दाभट येथे महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत चंद्रकांत तेरवणकर कार्यरत होता. ९
मार्च रोजी समिधा येरवणकर, साक्षी सोंडकर, जागृती तांबुटकर, तेजस्वी सुतार, सानिका गायकवाड आणि सायली यादव या सहा महिलांनी विश्वासाने ठेवण्यासाठी दिलेले सुमारे २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन तो फरार झाला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड पोलीस ठाण्याची विशेष पथक तात्काळ तपासासाठी रवाना झाले. मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती आणि पोलिसांचे गुप्त स्रोत यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. पुणे, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, धुळे आदी ठिकाणी तीन दिवसांत पोलिसांनी तपासाचे जाळे टाकले.
दरम्यान आरोपी वारंवार सिमकार्ड आणि ठिकाणे बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा मिळवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. या अडचणींवर मात करत पोलिसांनी अखेर पुणे परिसरातील ग्रामीण भागात लपून बसलेल्या आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्याठिकाणी सापळा रचत शुक्रवारी रात्री पोलिसांनी चंद्रकांत तेरवणकर याला चोरून नेलेल्या २ लाख ७१ हजार १०० रुपयांच्या दागिन्यांसह नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














