रत्नागिरी : धोकादायक वळणावर भीषण अपघात, दुचाकीस्वारासह महिला आणि लहान मूल जखमी

banner 468x60

करबुडे–रत्नागिरी मार्गावरील भावेआडोम परिसरातील धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यासोबत प्रवास करणारी महिला आणि एक लहान मूलही जखमी झाले आहे. ही घटना ११ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, करबुडे येथून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी निघाली होती. या दुचाकीवर चालकासोबत एक महिला व लहान मूल प्रवास करत होते. भावेआडोम परिसरात रस्ता वळणावळणाचा असून काही ठिकाणी वळणे अत्यंत धोकादायक आहेत. याचपैकी एका अवघड वळणावर दुचाकीस्वाराला रस्त्याचा अचूक अंदाज न आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्याबाहेर जाऊन रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड्यातील कातळावर जोरात आदळली.

धडकेनंतर दुचाकी सुमारे दहा फूट अंतरावर गटांगळ्या खात गेल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली. या भीषण धडकेत दुचाकीची सीट तुटून पडली असून गाडीच्या दर्शनी भागासह इतर अनेक भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी महिलेचा दुपट्टा, चप्पल तसेच लहान मुलाच्या आणि दुचाकीस्वाराच्या चप्पला रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यामुळे अपघाताची भीषणता लक्षात येत होती.

अपघात झाल्याचा आवाज परिसरात ऐकू आल्यानंतर जवळील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी जखमींना रस्त्याबाहेरून वर काढत प्राथमिक मदत केली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने तिघांनाही पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, भावेआडोम परिसरातील हे वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. येथे यापूर्वीही अनेकदा अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रस्त्यालगत योग्य संरक्षण कठडे, इशारा फलक तसेच वेगमर्यादेची स्पष्ट सूचना नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *