खेड : घाणेखुंट–लोटे येथे डायलिसिस सेवा सुरू; जनआरोग्य योजनेतून रुग्णांना मोफत उपचार

banner 468x60

खेड तालुक्यातील घाणेखुंट–लोटे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एम.इ.एस.ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे डायलिसिस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. अमनोरा येस फाउंडेशन, सिटी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरू करण्यात आली असून, परिसरातील किडनी आजारग्रस्त रुग्णांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.

किडनी विकारांनी त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना नियमित डायलिसिससाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन एम.इ.एस.ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने आधुनिक सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनासह डायलिसिस सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली आहे.

विशेष म्हणजे ही सेवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपलब्ध करण्यात आली असून, पात्र रुग्णांना या योजनेतून मोफत डायलिसिस उपचार दिले जाणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांनाही दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, डायलिसिस विभागात अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या सेवेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सौ. सुश्मिता पाटील (मो. 7775972441) किंवा मंगेश शेठ (मो. 9271665441) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *