गुहागर : श्रृंगारतळीतील ‘ओंकार ज्वेलर्स’मध्ये चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद

banner 468x60

गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानात झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी मुंबईतील घाटकोपर आणि कुर्ला परिसरातून चार सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्यासह सुमारे ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १.३१ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी श्रृंगारतळी बाजारपेठेतील ओंकार ज्वेलर्सच्या दुकानाचे बाहेरील शटर तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर चोरट्यांनी आतील शटर तोडण्याचाही प्रयत्न केला; मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांना चोरी करण्यात यश आले नाही. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला. एलसीबीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुंबईत सापळा रचून चार आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

१) निशांत सुधीर आंबोकर (घाटकोपर, मुंबई)
२) मोईन शकील शेख (घाटकोपर, मुंबई)
३) सुमित कुलदीप चुनियाना (कुर्ला, मुंबई)
४) आयुष जितेंद्र घागडा (घाटकोपर, मुंबई)

या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांचा समावेश होता.

जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस सतर्क असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *