खेड : मंदिरात देवीची पालखी नाचवली, पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील कोंडीवली रोहिदासवाडी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. मुंबईतून शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचा पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आदल्या दिवशी देवीची पालखी उत्साहात नाचवणाऱ्या व्यक्तीचा दुसऱ्याच दिवशी अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90 banner 728x90

संतोष कोंडविलकर हे मुंबईत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते सहकुटुंब शिमगोत्सवासाठी आपल्या मूळ गावी आले होते. रोहिदासवाडीत ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. विठ्ठल मंदिरात त्यांनी पालखी खांद्यावर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांसोबत उत्साहात नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या उत्सवात ते उत्साहाने सहभागी झाले होते.

मात्र, रात्री आनंदात साजरा केलेल्या उत्सवानंतर पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने मदत मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांच्या अकाली निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. “देवीची पालखी खांद्यावर नाचवली आणि दुसऱ्याच दिवशी देवाने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले,” अशा भावना व्यक्त करताना ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

मुंबईतील बांधकाम क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलेले संतोष कोंडविलकर हे मनमिळावू स्वभावामुळे परिचित होते. गावातील सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कोंडीवली परिसरासह मुंबईतील मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका उमद्या आणि यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने कोंडीवली गावाने आपला हिरा गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कोंडीवली रोहिदासवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कोंडीवली गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *