खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक पार पडली. यावेळी सर्व प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून कामकाज करण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर आणि उपसभापतीपदी सुनील मोरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी डॉ. अफिया पालेकर आणि सुनील मोरे यांना त्यांच्या दालनात नेऊन अधिकृत खुर्चीत विराजमान करून पदग्रहणाचा सोहळा पार पाडला. यावेळी उपस्थितांनी फुलांच्या गुच्छांनी व शुभेच्छांच्या वर्षावात त्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर आणि उपसभापती सुनील मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विविध विकासकामांना गती मिळेल, ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि नागरिकांच्या अडचणींना प्राधान्याने न्याय मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर यांनीही सर्व सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली. तसेच उपसभापती सुनील मोरे यांनीही पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














