खेड तालुक्यातील परशुराम लोटे एमआयडीसीमधील ‘डॉक्टर खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. इथाईल सिलिकेट केमिकल तयार होणाऱ्या प्लांटमध्ये झालेल्या या स्फोटामुळे कंपनीचे सिमेंटचे छत अंगावर पडल्याने आणि गरम घातक रसायने उडाल्याने फिर्यादी शिवानंद बाबूराव खोंडे यांच्यासह ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी कंपनीचे मालक डॉ. विखार अहमद खान, मॅनेजर सलीम अब्दुल वासे बिजापुरे, प्लांट इंचार्ज प्रीतम बाळकृष्ण पोलेकर आणि इतर व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास प्लांटमध्ये काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला.
या स्फोटाच्या तीव्रतेमुळे छताचे सिमेंटचे पत्रे कामगारांच्या अंगावर पडले, तर रिअॅक्टरमधील अतिउष्ण रासायनिक द्रव अंगावर उडाल्याने अनेक कामगार भाजले आहेत. जखमींमध्ये नंदकिशोर राणे, सुजन गोपाळ दास, असद खान, अरमान शहा, रणजित राणे, रघुनाथ खामकर, समीर शेख, महमद शेख, परवेझ शेख, विपीन मोरे आणि फिर्यादी शिवानंद खोंडे यांचा समावेश आहे. यातील काही कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या जिविताची सुरक्षा पूर्णपणे धाब्यावर बसवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. स्फोटक आणि घातक रसायनांशी संबंधित काम असतानाही व्यवस्थापनाने कामगारांना हेल्मेट, गमबूट, सेफ्टी ड्रेस, गॉगल किंवा हँड ग्लोव्हज यांसारखी कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. या निष्काळजीपणामुळेच इतकी मोठी दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(अ), १२५(ब), २८६, २८७, २८८ आणि ३(५) नुसार ७ मार्च रोजी गुन्हा नोंदवला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















