दापोली तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” या अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडवणे, तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
या शिबिरांमध्ये एकाच खिडकीत सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारणे, त्यावर प्रक्रिया करून तात्काळ निर्णय घेणे अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान, तक्रार निवारण यांसारख्या सेवाही नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण करून विविध शासकीय सेवा व दाखले नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या अभियानाला रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अर्चना बोंबे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर अभियान ७ मार्च ते १६ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आज आयोजित विशेष पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी व तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे, प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्यावर जलद कार्यवाही करणे, विविध दाखल्यांशी संबंधित अडचणी दूर करणे तसेच प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे हे आहे. गावोगावी आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमुळे नागरिकांना तालुका कार्यालयात वारंवार येण्याची गरज कमी होणार असून विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
विवादग्रस्त फेरफारांची संख्या निश्चित करून संबंधितांना पूर्वसूचना देण्यात येणार असून शिबिरांमध्ये हे फेरफार निकाली काढले जाणार आहेत. सबळ कारणाशिवाय फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
तसेच ७/१२ मधील चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, त्रुटी सूची देणे आणि तात्काळ करता येणाऱ्या दुरुस्त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाचा कर्मचारी उपस्थित राहणार असून डिजिटल ७/१२ व ८अ उतारे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदर अभियानांतर्गत ७ व १४ मार्च तसेच १७ एप्रिल रोजी मंडळ स्तरावर, तर ८ व १५ मे रोजी नगरपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांमध्ये गटविकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, अधीक्षक भूमी अभिलेख, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सर्व मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी सहभागी होणार आहेत. तहसीलदार कार्यालयाकडून शिबिरासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मंडळ कार्यालये, ग्राम महसूल कार्यालये, ग्रामपंचायती व सीएससी केंद्रांवर याबाबत प्रसिद्धी देण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत दापोली तालुक्यातील विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आंजर्ले मंडळासाठी महावीर भवन, केळशी येथे ७ मार्च २०२६, पालगड मंडळासाठी ग्रामपंचायत कार्यालय, विसापूर येथे १४ मार्च २०२६, देगाव मंडळासाठी कुणबी भवन, देगाव येथे १० एप्रिल २०२६, वाकवली मंडळासाठी श्रीमान मधुराबाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथे ११ एप्रिल २०२६, वेळवी मंडळासाठी ग्रामपंचायत कार्यालय, वेळवी येथे १७ एप्रिल २०२६, दाभोळ मंडळासाठी ग्रामपंचायत कार्यालय, दाभोळ येथे १८ एप्रिल २०२६, बुरोंडी मंडळासाठी करजगाव हायस्कूल, करजगाव येथे ८ मे २०२६, आगरवायंगणी मंडळासाठी कुणबी भवन, आगरवायंगणी येथे ९ मे २०२६, हर्णे मंडळासाठी एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णे येथे १५ मे २०२६ आणि अंतिम शिबीर दापोली येथे सर विश्वेश्वरैया सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरांमध्ये महसूल विभागाकडून ७/१२ उतारा, ८अ उतारा, राजपत्राद्वारे नाव दुरुस्ती आदेश, लक्ष्मी मुक्ती योजना, ई-फेरफार तसेच इतर महसुली तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी व आरोग्यविषयक योजनांबाबत माहिती दिली जाणार आहे. कृषी विभागाकडून ऍग्रीस्टॅक नोंदणी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी नोंदणी तसेच पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्यात येणार आहे.
याशिवाय भूमि अभिलेख विभागाकडून GNSS तंत्रज्ञानाविषयी माहिती, ई-रेकॉर्डस व भू-नकाशा प्रदर्शन तसेच पाणंद रस्ते मोजणी अभियानाबाबत माहिती दिली जाणार आहे. निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणीसाठी नमुना ६, ७ व ८ अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुरवठा विभागाकडून नवीन रेशनकार्ड, डिजिटल रेशनकार्ड यासंदर्भातील सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरांमध्ये विविध विभागांच्या सेवा व दाखल्यांचे प्रस्ताव तयार करून लाभार्थ्यांना पारदर्शक व जलद पद्धतीने सेवा देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या परिसरातील नियोजित शिबिरस्थळी उपस्थित राहून महसुल विषयक सेवा व दाखल्यांचा लाभ घ्यावा आणि महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















