Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

मंडणगड : जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला, वराडकर कुटुंबातील चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील वलौते पाबलवाडी येथे जमिनीच्या वादातून ७२ वर्षीय वृद्धावर धारदार शस्त्र व लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या हल्ल्यात मनोहर शिवराम वराडकर (वय ७२, रा. वलौते पाबलवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून दीपक बाळकृष्ण वराडकर, ज्योती दीपक वराडकर, निखिल दीपक वराडकर व क्षितीज दीपक वराडकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही घटना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. फिर्यादी मनोहर वराडकर हे आपल्या अंगणातील कुलदैवताच्या मंदिरातील लाईट लावून घरातील देवाच्या दिवाबत्तीसाठी जात असताना, संशयित आरोपींनी विनापरवाना त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी “माझी जमीन फुकट घेतोस काय, तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत दीपक वराडकर यांनी धारदार शस्त्राने फिर्यादींच्या डोक्यावर वार केला.

दरम्यान, निखिल वराडकर यांनी फिर्यादींना पकडून ठेवले, तर क्षितीज वराडकर यांनी लोखंडी सळीने त्यांच्या डाव्या हातावर व पाठीवर जोरदार फटके मारले. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादींना घराबाहेर फरफटत ओढत नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर १ मार्च २०२६ रोजी दुपारी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २४/२०२६ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १०९(१), ११८(२), ३३३, ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जमिनीच्या जुन्या वादातूनच हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेमुळे वलौते परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडणगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *