राजापूर : गोव्याहून मुंबईकडे जाणारा दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

banner 468x60

राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली असून, सुमारे १ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आणि सहाचाकी कंटेनर जप्त केला आहे. ही धडक कारवाई २७ फेब्रुवारी २०२६ रोजी भरारी पथक, रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर एका पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या कंटेनरमधून (क्र. ML 01 AD 0121) परराज्यातील गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचून केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडचे एकूण १३०० बॉक्स आढळून आले.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालामध्ये १ कोटी ३७ लाख २८ हजार रुपये किमतीच्या ११,२३२ लिटर मद्याचा आणि साडेबावीस लाख रुपये किमतीच्या वाहनाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक गणेश कुमार पोकरराम (रा. बारमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही यशस्वी कामगिरी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि रत्नागिरीच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक गणेश जाधव आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत. जिल्ह्यात कोठेही अवैध मद्य विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *