रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथील दालभेश्वर पाखाडी परिसरात २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज २४ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली. आकाश अरुण वेद्रे (वय २६, रा. दालभेश्वर पाखाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर झाले होते. त्या अनुषंगाने दालभेश्वर पाखाडी येथे नवीन घराचे बांधकाम सुरू होते. बांधकामाच्या कामासाठी आकाश हा सुमारे सहा महिन्यांपूर्वी गावी परत आला होता आणि आई-वडिलांसोबत राहत होता. तो घराच्या कामात सक्रिय सहभाग घेत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
२३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता आकाशने आपल्या आई-वडिलांसोबत जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपले. मात्र २४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्याची आई शौचालयासाठी उठली असता आकाश घरात दिसून आला नाही. काही वेळ तो परत न आल्याने संशय आल्याने त्यांनी बॅटरीच्या उजेडात परिसरात शोध घेतला.शोधादरम्यान नातेवाईक दशरथ शंकर वेद्रे यांच्या नव्याने सुरू असलेल्या घराच्या बांधकामातील एका खोलीत आकाश हा लोखंडी भाल्याला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला.
हे दृश्य पाहून आईने आरडाओरडा केला. त्यानंतर रविंद्र नवजेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यास पाचारण करण्यात आले. तपासणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आकाशला मृत घोषित केले. या घटनेची नोंद २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.१३ वाजता करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार एस. बी. कांबळे करीत आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण दाभोळ परिसरात शोककळा पसरली असून नागरिक कुटुंबीयांना धीर देत आहेत. तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर मानसिक आघात झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













