रत्नागिरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी
कारवाई करत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-१ अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी तब्बल २४ हजार रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती १६ हजार ५०० रुपये स्वीकारताना गुरुवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांचा यात समावेश आहे.
दापोली पंचायत समिती येथील लेखापरीक्षणातील प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यासाठी एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याकडून १६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी उशिरा एकाच वेळी तीन लोकसेवकांना रंगेहाथ अटक केली.
या प्रकरणातील ५५ वर्षीय तक्रारदार दापोली पंचायत समितीत सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरीमार्फत करण्यात आले होते. या अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपालन अहवाल सादर केला होता. हा अहवाल अंतिम करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांची भेट घेतली.
त्यावेळी, २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी जाधव यांच्या वतीने घवाळी याने तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या लाच मागणीविरोधात तक्रारदाराने ११ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी या मागणीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती १६ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी, सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळी याने तक्रारदाराकडून १६,५०० रुपयांची लाच स्वीकारली आणि ती रक्कम तात्काळ जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केली. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















