खेड : देवघर मार्गावर भीषण अपघात. दुचाकीचालक गंभीर जखमी

banner 468x60

खेड तालुक्यातील कुडोशी गावाजवळ आज दुपारी पावणेचारच्या सुमारास खेडकडून देवघरकडे जाणारी ऍक्टिव्हा आणि समोरून येणारा मालवाहतूक टेम्पो मॅक्सिमो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ऍक्टिव्हा चालक गंभीर जखमी झाला आहे.


जखमी व्यक्तीची ओळख योगेश मनोहर मोहिते (वय ४५, राहणार देवघर बौद्धवाडी) अशी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच, खेड भरणे नाका ब्रिजजवळ असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी योगेश मोहिते यांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. अरुंद रस्त्यावर वळणावर असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऍक्टिव्हाचे मोठे नुकसान झाले असून योगेश मोहिते यांना गंभीर दुखापत झाली आहे.


अपघातामुळे घटनास्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अरुंद रस्त्यांवरील वाहतुकीबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *