रत्नागिरी : दुःखद मांडवीच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका. राजश्री बिपीन शिवलकर यांचे सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मांडवी परिसरासह संपूर्ण रत्नागिरी शहरात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांना त्यांच्या घरी अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

राजश्री शिवलकर या कॉलेज जीवनापासूनच मृदूभाषी, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या म्हणून परिचित होत्या. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी मांडवी भागातून नगरसेविका म्हणून काम केले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील विविध विकासकामांसाठी योगदान देत जनसेवेत सक्रिय सहभाग घेतला.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, नागरिक तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने एक प्रेमळ आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

राजश्री शिवलकर यांची अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी १२ वाजता मांडवी येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार असून, मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिवलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रत्नागिरी शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *