रत्नागिरी शहरात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांचे कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या इंडसइंड बँकेतील एफडी खात्यातून तब्बल ₹8 लाख 62 हजार 400 रुपये सेव्हिंग खात्यात वळवून ती रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 281/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे 61 वर्षीय सेवानिवृत्त असून रत्नागिरी शहरातील टिळक आळी परिसरात राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 9.24 वाजता फिर्यादी यांनी मोबाईलमध्ये ‘क्रॅप्टो’ अॅप डाउनलोड केले. या अॅपच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्ड तयार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे अॅप मोबाईलमधून अनइन्स्टॉल केले.
मात्र त्यानंतर त्यांच्या इंडसइंड बँकेतील एफडी खात्यातील रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सेव्हिंग खात्यात वळवली आणि त्यानंतर ती रक्कम काढून घेतली. आपल्या खात्यातून ₹8,62,400 रुपये परस्पर काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(क) आणि 66(ड) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना 15 ऑगस्ट रोजी घडली असून 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2.33 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपीचा शोध सुरू असून या अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची माहिती कशी मिळवण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
अनओळखी अॅप्स डाउनलोड करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी आणि बँकिंगशी संबंधित परवानग्या मागणाऱ्या अॅप्सपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













